वसई-विरार महापालिकेच्या ९ कंत्राटी इंजिनियर आणि कर्मचा-यांचा मद्यधुंद अवस्थेत नाचतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला असून यानंतर या सर्वांना रविवारी महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. हे सर्व कर्मचारी अतिक्रमण विरोधी पथकात कार्यरत असून ज्या भूमाफीयांच्या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी त्यांना नेमण्यात आले आहे, त्यांच्याच सोबत या कर्मचा-यांनी अशी जंगी ओली पार्टी केल्याने वसई-विरार महापालिकेच्या कर्मचा-यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वसई आणि विरार शहरांमध्ये रविवारी सकाळपासून काही लोक समुद्रकिनारी आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीत मद्यधुंद अवस्थेत नाचत असल्याचा व्हीडिओ सोशल नेटवर्कीग साईट्सवर व्हायरल झाला होता. या व्हीडिओत नाचणारे सर्वजण वसई-विरार महापालिकेचे कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता स्वरूप खानोलकर यांच्यासह नरेंद्र संखे, योगेश सावंत, रोशन भगत, केयूर पाटील, प्रवीण मुळीक, निनाद सावंत, कौस्तुभ तामोरे, निलेश मोरे, इंद्रजीत पाटील, परमजीत वर्तक आणि युवराज पाटील यांचा यात समावेश होता. शिवाय शहरात अनधिकृत बांधकामे करणारे काही भूमाफीयाही यात दिसत होते. स्वरूप खानोलकर यांच्या २४ जानेवारी रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त २२ जानेवारी रोजी वसईच्या समुद्रकिनारी फटाक्यांची आतषबाजी, विदेशी मद्य आणि डीजेच्या तालावर ही जंगी पार्टी झाली.
या व्हीडिओची वसई-विरार महापालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे यांनी गंभीर दखल घेत रविवार असूनही या सर्वाच्या निलंबनाचे आदेश दिले. महापालिकेची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हा व्हीडिओ खाजगी पार्टीतला असला, तरी सार्वजनिक ठिकाणी अशोभनीय वर्तन करणे योग्य नसल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. या प्रकरणाची वसई-विरारमध्ये जोरदार चर्चा सुरू असून कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे.
