स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू इच्छिणा-या उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरण्याची सक्ती न करता, निवडणूक निर्णय अधिका-यांसमोर अर्ज भरण्याची पूर्वीची तरतूद कायम ठेवावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांनी मुख्य निवडणुक आयुक्त ज. स. सहारिया यांना पत्र पाठवून केली आहे.
श्री. नारायण राणे यांनी श्री.साहारिया यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणा-या उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात पुरेशा क्षमतेचे इंटरनेटचे जाळे उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाईन अर्ज भरताना एका उमेदवारासाठी ४ ते ५ तासाचा वेळ ऑनलाईन अर्जाकरिता जात आहे. हीच पद्धत कायम ठेवल्यास उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची वेळ उमेदवारांना पाळता येणे शक्य नाही. आणि वेळेवर अर्ज भरणे शक्य होणार नाही. श्री. राणे यांनी मागणी केली आहे की, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याच्या व्यवस्थेप्रमाणे निवडणूक निर्णय अधिका-यासमोरही समक्ष हजर राहून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याच्या सुचना संबंधितांना द्याव्यात, अशी माझी मागणी आहे.
