गणिताच्या कोड्यातून सुटण्यासाठी मुलीने सोडले घर

गणित विषयातून सुटका करत, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी पवई हिरानंदानी येथील एका उद्योगपतीच्या १२ वर्षांच्या मुलीने चक्क घर सोडल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अवघ्या १५ तासांत मुलीचा शोध घेत, तिला सुखरूप कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले.

पवईतील उच्चभ्रू वसाहतीत १२ वर्षांची अ‍ॅना (नावात बदल) आई-वडिलांसोबत राहाते. तेथीलच एका नामांकित खासगी विद्यालयात ती सातवीचे शिक्षण घेत आहे.

तिचे वडील मुंबईतील प्रतिष्ठित उद्योगपती आहेत. ते एका बड्या नेटवर्किंग साइटचे अध्यक्ष आहेत, तर आई गृहिणी. अ‍ॅना लहानपणापासूनच लाडा-कौतुकात वाढलेली आहे. मंगळवारी तिला नेहमीप्रमाणे मोठ्या भावाने शाळेच्या गेटबाहेर सोडले. मात्र, शाळेच्या गेटमध्ये आत जाण्याचे नाटक करत ती बाहेर पडली. वर्गात अ‍ॅना गैरहजर असल्याचे समजताच, शिक्षकांनी तिच्या मैत्रिणींकडे विचारणा केली, तेव्हा ती शाळेच्या गेटवर आली असल्याची माहिती त्यांना मिळाली. याबाबत त्यांनी तत्काळ तिच्या आईला कळविले. मुलीच्या गायब होण्याच्या माहितीने तिच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली, शोधाशोध सुरू झाली. नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडे

तिचा शोध घेतला. मात्र, काहीच थांगपत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. हायप्रोफाइल मिसिंग प्रकरण असल्याने वरिष्ठांकडूनही पोलिसांवर दबाब वाढला. सोशल मीडियावर मुलीचे फोटो माहिती अपलोड करण्यात आल्याने चर्चाही वाढली होती. त्यामुळे मुलगी चुकीच्या व्यक्तीच्या हातात लागण्याच्या

आत शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते.

वरिष्ठ निरीक्षक बी.के. महाडेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथके नेमण्यात आली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात साध्या गणवेशात पोलिसांनी शोध सुरू केला. रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. अ‍ॅना एरवी कधीच बाहेर पडली नव्हती. रात्री बारापर्यंत तिचा शोध लागला नाही. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडत होती. तपास पथकाकडून मात्र, कसून तपास सुरू होता. रात्रीच्या वेळेस पथकाने रेल्वे स्थानकांकडे मोर्चा वळवित पुन्हा शोध सुरू केला. रात्रीच्या अडीचच्या सुमारास सीएसटी स्थानक परिसरात गोंधळलेल्या अवस्थेत असलेली अ‍ॅना सापडली आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *