जोपर्यंत हरवलेला पोपट घरी परतणार नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही माझ्या पोटात जाणार नाही..’ हा काही चित्रपटातला संवाद नाही. तर घरी पाळलेल्या पोपटावर जीव लावलेल्या बबिता देवींचा हट्ट आहे. याच हट्टापायी त्यांच्या नातलगांनी चक्क ‘पोपट हरवलाय, शोधून देणा-या व्यक्तीला २५ हजारांचे इनाम’ असे पत्रक छापून ते घरोघरी वाटायला सुरूवात केली आहे. एवढच नाही तर व्हॉट्स अॅप ग्रुपवरही हरवलेल्या पोपटला शोधून काढण्यासाठी शोधमोहिम हाती घेतली आहे पण काही केल्या या पोपटाचा पत्ता लागेना.
नावाडा जिल्ह्यात राहणा-या बाबिता देवींचा पाळीव पोपट ३ जानेवारीपासून बेपत्ता झालाय, त्यामुळे या पोपटाला शोधून देणा-याला त्यांनी चक्क २५ हजारांचे बक्षीस देण्याचे कबुल केले आहे. गेल्या आठ वर्षांपासून त्यांनी पोपट पाळला होता. त्यांच्यासाठी तर हा पोपट कुटुंबतील एका सदस्याप्रमाणेच होता. म्हणूनच बबिता यांनी त्याला कधीच पिंज-यात ठेवले नाही. पण ३ जानेवारी पासून हा पोपट बेपत्ता आहे, म्हणून जोपर्यंत हा पोपट घरी परतत नाही तोपर्यंत जेवायचे नाही असा हट्ट त्यांनी धरला आहे. शेवटी आईच्या हट्टापायी मुलांनी पत्रक काढून बेपत्ता पोपटाची जाहिरात केलीय आणि हे पत्रक त्यांनी आजूबाजूच्या परिसरात वाटली आहेत. असेच एक पत्रक येथील महाविद्यालयाचे प्राध्यापक पांड्ये यांच्या हाती लागले आणि बेपत्ता पोपटाचा किस्सा आता सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता महिना होईल तरी बेपत्ता पोपट काही सापडेना म्हणून बबिता देवींच्या मुलांनी व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियावर या पोपटाला शोधण्यासाठी एक मोहिमच सुरु केली आहे. आता यात तरी यश येते की नाही देवास ठावूक.