बफार्खाली अडकलेल्या ५ जवानांची सुखरुप सुटका

बफार्खाली अडकलेल्या ५ जवानांची सुखरुप सुटका

कुपवाडा जिल्ह्यात माछिल परिसरात लष्करी छावणीजवळ झालेल्या हिमस्खलनामुळे बफार्खाली अडकलेल्या ५ जवानांना सुखरुप बाहेर काढण्यात लष्कराच्या बचाव पथकांना यश आले आहे. हिमकडा कोसळून खाली आल्यामुळे लष्करी छावणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले होते. गस्त घालताना हिमकडय़ाखाली सापडून हे जवान अनेक फूट बर्फाखाली दडपले गेले होते.

यंदा काश्मीर खो-यात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत आहे. त्यामुळे हिमस्खलनाच्या घटना वारंवार घडत असून, हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या आठवडाभरात तीन ठिकाणी लष्कराला हिमस्खलनाच्या संकटाला आणि प्राणहानीला सामोरे जावे लागले आहे. हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे बनिहाल-रामबन सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी हिमस्खलन आणि दरडी कोसळण्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळे महामार्गही ठप्प आहे. महामार्गावरील दरडी, बर्फ हटवून वाहतूक पुन्हा सुरु करण्यासाठी सीमा मार्ग संघटनेची पथके झटत आहेत.

काश्मीरच्या गुरेझ भागात बुधवारी झालेल्या हिमस्खलनात लष्करातील मेजरसह २४ जवानांचा मृत्यू झाला असून, त्यात महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे. त्यापैकी दोघे अकोल्याचे तर एक बीड जिल्ह्यातील आहे. याआधी, मध्य काश्मीरमधील गंदेरबाल जिल्ह्यातील सोनमर्ग येथे झालेल्या हिमस्खलनात मेजर दर्जाचा लष्करी अधिकारी शहीद झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *