येथील सराफा बाजारात सोने सलग दुसऱ्या व्यावसायिक सत्रात घसरून दोन आठवड्यांच्या नीचांकावर पोहोचले. चांदीतही मोठी घसरण झाली.
सोने ४00 रुपयांनी घसरून २९,१५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. दिल्लीत ९९.५ टक्के शुद्धतेचे सोनेही ४00 रुपयांनी घसरून २९,000 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. १२ जानेवारी रोजी सोने २९,२५0 रुपये प्रति १0 ग्रॅम होते. त्यानंतरची नीचांकी पातळी त्याने आज गाठली. चांदी ५५0 रुपयांनी घसरून ४0,९५0 रुपये किलो झाली. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदी ६९५ रुपयांनी घसरून ४0,६४५ रुपये किलो झाली आहे. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ७२ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७३ हजार रुपये प्रतिशेकडा झाला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे होती घेतल्यानंतर समीकरणे बदलली आहे. अमेरिकी शेअर बाजारात अभूतपूर्व तेजी आली आहे. अमेरिकेचा डाऊ जोन्स निर्देशांक पहिल्यांदाच २0 हजार अंकांच्या पुढे गेला आहे. अमेरिकी डॉलरही मजबूत झाला आहे. याचा परिणाम जगभरातील बाजारांवर झाला.