निवडणुकीचा ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या कार्यशाळेचे आयोजन

आगामी निवडणुकांसाठी उमेदवारांना ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निवडणुकीचा फॉर्म कसा भरायचा याचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी येऊन प्रशिक्षण घेतले. बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी १०.२० ते १२ या दरम्यान हे प्रशिक्षण घेण्यात आले. शहरातील ४१ प्रभागांतील जवळपास अंदाजे २ हजार जण या वेळी उपस्थित होते. महानगर पालिकेचे उप-आयुक्त सतीश कुलकर्णी, माहिती व संगणक विभागाचे राहुल जगताप, क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि उमेदवार या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उमेदवारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. तसेच त्यांच्या सर्व शंकांचे निरसन निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. आपली शैक्षणिक आर्हता, व्यवसाय, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही अशा अनेक बाबी या ऑनलाइन फॉर्मवर असतात. तेव्हा हे कसे भरायचे याचे योग्य मार्गदर्शन करण्यात आले. या निवडणुकीमध्ये उमेदवाराने आपला फॉर्म, शपथपत्र आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाइन जमा करणे आवश्यक आहे असे सतिश कुलकर्णी यांनी म्हटले. महापालिकेनी या कार्यशाळांचे आयोजन करावे अशी सूचना निवडणूक आयोगातर्फे आली आहे. त्यानुसार या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. उमेदवारांव्यतिरिक्त या कार्यशाळेमध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी देखील भाग घेतला होता. किमान पाच प्रतिनिधी पाठवावेत असे आवाहन आम्ही राजकीय पक्षांना केले होते असे कुलकर्णी यांनी सांगितले. हे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी त्यांच्या पक्षातील उमेदवारांना फॉर्म भरण्यास सहकार्य करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *