मस्जिद बंदरजवळ अग्नितांडव!

मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळील दानाबंदर, एलएलसी कंपाऊंड येथील गोदाम आणि झोपडपट्टीला सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली. त्याचा मोठा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला. सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे संध्याकाळी घाईघाईने घरी परतणा-या चाकरमान्यांचे लोकलसाठी प्रचंड हाल झाले.

सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास मस्जिद बंदर आणि सीएसटी स्थानकांदरम्यानच्या रेल्वे रूळाशेजारील झोपडपट्टीला ही आग लागली. या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले होते. एलएलसी कम्पाऊंडमध्ये ही आग पसरत गेली.

आगीची तीव्रता एवढी होती की, तिचे लोण रेल्वे रूळावर येते होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सीएसटी स्थानकावरून जलद मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. धिम्या मार्गावर देखील वाहतूक संथगतीने सुरू होती.

मात्र या आगीचे कारण समजू शकलेले नाही. आगीची खबर मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी १२ फायर इंजिन आणि आठ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *