हॉकी इंडिया लीगच्या (एचआयएल) पाचव्या आवृत्तीला शनिवारपासून (२१ जानेवारी) मुंबईत सुरुवात होत आहे. मुंबई हॉकी असोसिएशनच्या (एमएचए) स्टेडियमवर होणा-या उद्घाटनीय लढतीत यजमान दबंग मुंबई संघ दोन वेळचा विजेता रांची रेज् संघाशी दोन हात करेल.
ऑस्ट्रेलियाचे माजी हॉकीपटू जय स्टॅकी यांच्या प्रशिक्षकपदाखालील मुंबई संघात ज्युनियर वर्ल्डकप विजेत्या संघातील पाच हॉकीपटू आहेत. त्यात गोलकीपर किशन पाठक, ‘ड्रॅगफ्लिकर’ हरमनप्रीत सिंग, मिडफिल्डर, निलकांता शर्मा आणि मनप्रति सिंग तसेच फॉरवर्ड गुरजंत सिंगचा समावेश आहे. जर्मनीचा स्ट्रायकर फ्लोरियन फुकससह सहा परदेशी हॉकीपटूंवरही मुंबईची भिस्त आहे.
प्रतिस्पर्धी रांची संघाचे प्रशिक्षक ज्युनियर वर्ल्डकप विजेते प्रशिक्षक हरेंद्र सिंग आहेत. या संघात इंग्लंडच्या अॅश्ली जॅकसनसह बॅरी मिडलटन, ऑस्ट्रेलियाचा फेर्गस कावनॅग तसेच भारताचा गुरबज सिंग, कोठाजीत सिंग, मनप्रीत सिंग, बिरेंद्र लाक्रा तसेच वर्ल्डकप विजेत्या ज्युनियर संघातील चार हॉकीपटूंचा समावेश आहे.
रांचीनंतर मुंबई संघ उत्तर प्रदेश विझार्ड्स
(२४ जानेवारी), गतविजेता पंजाब वॉरियर्स (२७ जानेवारी), माजी विजेता दिल्ली वेवरायडर्स (३० जानेवारी) तसेच ‘होमग्राऊंड’वरील शेवटच्या साखळी लढतीत कलिंगा लान्सर्सशी (३१ जानेवारी) दोन हात करेल.