तुर्कस्थानकडे निघालेले मालवाहू बोईंग ७४७ विमान किरगिझस्तानातील मनास विमानतळाबाहेर निवासी भागात कोसळल्याची दुर्घटना सोमवारी घडली. या घटनेत रहिवासी आणि विमानातील कर्मचारी अशा एकूण ३७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
हाँगकाँग येथून एसीटी एअरलाईन्सचे हे मालवाहू विमान तुर्कस्थानची राजधानी इस्तंबूलकडे निघाले होते. सोमवारी ते किरगिझस्तानची राजधानी बिश्केकच्या दक्षिणेला असलेल्या मनास विमानतळाबाहेर कोसळले. यामुळे येथील १५ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
या घरांत राहणारे रहिवासी व विमानातील कर्मचारी असे एकूण ३७ जण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले असून १५ जण जखमी झाले आहेत. विमान कोसळले त्यावेळी हवामान चांगले होते, शिवाय विमानातही काही बिघाड नव्हता. त्यामुळे विमान कोसळले कसे? याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
विमानाचा ब्लॅक बॉक्स अद्याप सापडलेला नसून तो सापडल्यानंतरच अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकणार आहे. मनास विमानतळ अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान मोहिमेसाठी घेतले होते. त्यांची माहिम संपल्यानंतर २०१४ साली त्यांनी ते किरगिझस्तानला परत केले.
काही दिवसांपूर्वी रशियाचे विमानही याच उपखंडात कोसळले होते. यामागे दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.