शीना बोराचा खून इंद्राणी, पीटर मुखर्जी व संजीव खन्नाने केला

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाचा ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने मंगळवारी पर्दाफाश केला. शीनाची हत्या तिची आई इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी व पहिला पती संजय खन्ना यांनीच केल्याचा आरोप या तिघांविरोधात निश्चित करण्यात आला आहे.

सर्व आरोपींविरोधात कोणते आरोप ठेवण्यात आले आहेत, याची माहिती न्यायालयाने दिली. २०१२ साली शीना बोरा हत्याकांड उघड झाल्यानंतर या हायप्रोफाईल खून प्रकरणाची चर्चा संपूर्ण देशभर होती. न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी या प्रकरणावरील सुनावणी १ फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवली आहे. सर्व तीन आरोपींविरोधात गुन्ह्याची माहिती लपवणे, हत्येच्या कटात सहभाग, अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करणे आदी आरोप आहेत. इंद्राणी आणि तिचा पहिला पती संजीवविरोधात कलम ३०७ अन्वये (खुनाचा प्रयत्न) व गुन्ह्याची माहिती दडवणे आदी आरोपांसोबत शीनाचा भाऊ मिखाईल बोराची कट रचून हत्या केल्याचा आरोप आहे.

सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणीदरम्यान इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी आणि पहिला पती संजीव खन्ना हे दोघेही हजर होते. हे दोघेही वेगवेगळय़ा ठिकाणी बसले होते. बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडात सीबीआयने १९ डिसेंबरपासून युक्तिवाद आणि आरोप निश्चितीला सुरुवात केली होती. पीटर मुखर्जीचा मुलगा राहुलसोबत शीनाचे प्रेमसंबंध होते. ते लवकरच लग्नही करणार होते. त्यादरम्यान शीनाची हत्या झाल्याचे तपासात उघड झाले होते. २४ एप्रिल २०१२ रोजी शीनाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह रायगड जिल्हा पेण तालुक्यातील एका जंगलात पुरण्यात आला होता. या प्रकरणात शीनाची आई इंद्राणी मुखर्जीला ऑगस्ट २०१५ साली अटक करण्यात आली होती. या प्रकरणी इंद्राणी, पीटर, संजीव खन्ना आणि चालक संजीव राय यांना अटक झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *