मुंबई-वाराणसी विमानात अस्वस्थ वाटल्याने तरुण महिलेचा मृत्यू

मुंबईहून वाराणसीला निघालेल्या स्पाईसजेटच्या विमानामध्ये एक २४ वर्षीय तरूण महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी स्पाईसजेटच्या विमानामधील कर्मचाऱ्यांनी माझ्या पत्नीला वेळीच वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली नाही, असा आरोप संबंधित महिलेच्या पतीने केला आहे. संगीता असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.

संगीता आपल्या पतीसोबत बुधवारी स्पाईसजेटच्या विमानाने मुंबईहून वाराणसीला निघाल्या होत्या. विमानाने उड्डाण केल्यावर काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्याचबरोबर श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. यावेळी त्यांना तातडीने आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात आल्याचे स्पाईसजेटने म्हटले आहे. त्याचबरोबर विमान वाराणसीमधील लाल बहादूर शास्त्री विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच त्यांना रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथे नेल्यावर कोणतेही उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, संगीता यांचा मृत्यू विमानातच झाला की रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात आणताना झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबद्दल काही बोलण्यास डॉक्टरांनीही नकार दिलाय.

संगीता यांचे पती राजेश हे मुंबईत कामाला आहेत. विमानामध्ये माझ्या पत्नीला तातडीची मदत मिळाली नाही. विमानातील कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही. तिला ऑक्सिजन मास्कही वापरू दिला नाही. त्यामुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप राजेश यांनी केला. विमानाने उड्डाण केल्यानंतर सुमारे तासाभराने संगीता यांना अस्वस्थ वाटू लागले. पण त्यावेळी आवश्यक मदत आम्हाला मिळाली नाही, असे राजेश यांनी म्हटले आहे.

स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, संगीता यांना विमानात अस्वस्थ वाटू लागल्यानंतर लगेचच विमानातील एका डॉक्टरने त्यांची तपासणी केली. विमानातील कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना मदत केली. त्याचबरोबर संबंधित प्रवाशाला आवश्यक असलेली सर्व मदत उपलब्ध करून दिली. विमानाच्या कॅप्टनने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याबद्दल माहिती देऊन विमानाच्या लॅंडिंगवेळी रुग्णवाहिका तयार ठेवण्याची सूचना केली. विमान हवाई तळावर उतरल्यानंतर तेथील डॉक्टरांनी महिलेची तपासणी केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात जाईपर्यंत आमचे कर्मचारी संगीता आणि त्यांच्या पतीसोबत होते, असेही या प्रवक्त्याने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *