नाशिकमध्ये पूल वाहून गेला, दाभोळमध्ये दरड कोसळली

नाशिकमध्ये पूल वाहून गेला, दाभोळमध्ये दरड कोसळली

कोकण, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळणे, रस्त्यावर झाड पडणे, पूल वाहून जाणे असे प्रकार घडल्यामुळे काही प्रमाणात तेथील स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले.
इगतपुरी तालुक्यात जुना पूल वाहून गेला
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. यामुळे तालुक्यातील घोटी आणि काळुस्ते यांना जोडणारा दारणा नदीवरील जुना पूल वाहून गेल्याने कोळस्तेकडील १५ गावांचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, गावकरी वापरत असलेला जुना पूल आणि कच्चा रस्ता नदीला आलेल्या पूरात वाहून गेला. यामुळे या गावांचा घोटीशी असलेल्या संपर्क तुटला.

दाभोळमध्ये दरड कोसळली
रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळमध्ये पावसाने दरड कोसळल्यामुळे त्यामध्ये तीन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरड आणि मातीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर झाड पडले
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रत्नागिरी रस्त्यावर कोतोली फाट्याजवळ वडाचे झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने आणि रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱया वाहतुकीवर यामुळे परिणाम झाला आहे. झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *