बेरोजगार ग्राफिक डिझायनरने दोन हजार आणि पाचशे रुपयाच्या बनावट नोटा छापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोटांवरील शाईने या ग्राफिक डिझायनरचे बिंग फोडले असून याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ग्राफिक डिझायनर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत राहणारा २५ वर्षाचा ग्राफिक डिझायनर कृष्णन भारद्वाज हा तरुण एका दुकानात खरेदीच्या निमित्ताने गेला होता. त्याने दुकानदाराला २ हजाराची बनावट नोट दिली. मात्र दुकानदाराला नोटेवरील शाईवर संशय आला आणि त्याने याप्रकाराची माहिती ओळखीतील एका पोलीस हवालदाराला दिली. मग पोलीस तपासात दोन तरुणांनी सुरु केलेल्या या ‘उद्योगा’चा उलगडा झाला.
नजाफगढ आणि उत्तमनगरमध्ये बनावट नोटा चलनात आल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यामुळे दुकानदाराकडून माहिती मिळताच पोलिसांचा भारद्वाजवरील संशय बळावला. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पोलिसांनी भारद्वाजच्या घराची झाडाझडती घेतली असता घरातून दोन हजार आणि पाचशेच्या तब्बल ६ लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळला. याशिवाय प्रिंटरही जप्त करण्यात आले. बनावट नोटा छापण्यासाठी भारद्वाजने २५ हजार रुपये खर्च केले होते.
भारद्वाज हा ग्राफिक डिझायनर असून त्याचा सहकारी आशिष हा मोबाईल टेक्निशियन आहे. उच्च दर्जाच्या स्कॅनर आणि प्रिंटरच्या मदतीने हे दोघे बनावट नोटा छापून ते बाजारात पसरवत होते. आशिषने पैशांसाठी हे कृत्त केले. तर भारद्वाजला मात्र राजकीय महत्त्वाकांक्षा असून यासाठीच तो पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग शोधत होता. सध्या हे दोघेही तुरुंगात आहेत.
संगणकाचे उत्तम ज्ञान असल्याने भारद्वाजने यापूर्वी शिक्षक म्हणूनही काम केल्याचे पोलीस तपासात समोर आले. भारद्वाज आणि आशिषची दोन वर्षांपूर्वी भेट झाली होती. एका हॉलिवूड चित्रपटातून प्रेरणा घेत हे दोघे बनावट नोटांच्या क्षेत्रात उतरले. काही महिन्यांमध्ये दोघांमध्ये वाद झाला आणि त्यांची पार्टनरशिप मोडली. पण नोटाबंदीनंतर हे दोघेही नोटा छापण्यासाछी एकत्र आले.
