३१ जानेवारीला मराठा मोर्चा निघणारच

मराठा आरक्षणाच्या आग्रही मागणीसाठी येत्या ३१ जानेवारी रोजी मुंबईत काढण्यात येणारा ‘मराठा मोर्चा’ त्याच दिवशी काढण्यात येणार असल्याचे सोमवारी आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले.

मराठा मोर्चात काही मंडळी फूट पाडण्याचे काम करत असून हा मोर्चा स्थगित झाल्याचे सांगत आहेत. या संदर्भात औरंगाबाद येथे झालेल्या मराठा मोर्चाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा मोर्चा ३१ जानेवारी रोजीच काढला जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.

मुंबईत काढण्यात येणा-या मराठा समाजाच्या मोर्चासंदर्भात औरंगाबाद येथे राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ३१ जानेवारी रोजी मुंबईत सकल मराठा मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याप्रमाणे तयारीही सुरू होती.

मात्र, मुंबई महापालिका निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करत मुंबई संयोजन समितीने मराठा मोर्चा रद्द केल्याचे जाहीर केले होते. मात्र आता राज्यव्यापी बैठकीत आचारसंहितेचे कारण झुगारून देत हा मोर्चा ३१ जानेवारी रोजी काढला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *