मुंबई मॅरॅथॉनसाठी स्ट्रायडर्स ग्रुप सज्ज

भारताच्या मॅरॅथॉन कॅलेंडरमधील सर्वात प्रतिष्ठेच्या स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरॅथॉनमध्ये अनेक ग्रुप तसेच सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था धावतात. या मॅरॅथॉनमध्ये नेहमी सहभागी होणारा स्ट्रायडर्स ग्रुप यंदाही सज्ज आहे. रविवारी (१५ जानेवारी) होणा-या १४व्या आवृत्तीत या ग्रुपचे १८५० सदस्य धावणार आहेत.

चांगली तंदुरुस्ती (फिटनेस) राखण्याची इच्छा असणा-या तसेच धावण्याच्या ‘रेस’मध्ये सहभाग घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी स्ट्रायडर्स ग्रुप गेल्या दहा वर्षापासून प्रशिक्षण देत आहे. दीपक लोंढे आणि प्रफुल उचिल या दोन प्रशिक्षकांनी या ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपची लोकप्रियता आता इतकी वाढली आहे की, सदस्यांसह प्रशिक्षकांची संख्याही मोठी आहे. सध्या या ग्रुपमध्ये ५०हून अधिक प्रशिक्षक आहेत. मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता, पुणे, हैदराबाद आणि कोचिनसह देशभरातील १२ शहरे आणि २४ केंद्रांवर हा फिटनेस ग्रुप सक्रिय आहे. स्ट्रायडर्समध्ये वेगवेगळय़ा पद्धतींचे शिक्षण दिले जाते. त्यामध्ये एरोबिक्स (सावकाशपणे सतत धावणे), को-ऑíडनेशन, क्षमताचाचणी, अ‍ॅनोबरिक आणि टाइम ट्रायल्स आदी प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

यंदाच्या मुंबई मॅरॅथॉनमध्ये स्ट्रायडर्स ग्रुपचे विक्रमी १८५० सदस्य सहभागी होत आहे. मॅरॅथॉनमध्ये इतक्या मोठय़ा संख्येने सहभागी होणारा तो देशभरातील एकमेव ग्रुप आहे. या ग्रुपतर्फे टाटा कन्सलटन्सी सíव्हसेस (टीसीएस) या कंपनीमधील कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रशेकरन यांचा समावेश आहे. स्ट्रायडर्स ग्रुप आणि टीसीएसच्या संयुक्त विद्यमाने कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचा-यांना धावण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

या दोन संस्थांतर्फे १८०० सर्वसामान्य नागरिक तसेच कॉर्पोरेट क्षेत्रामधील २५० लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. बँकिंग, वित्तपुरवठा क्षेत्रामधील अनेक मंडळी स्ट्रायडर्स ग्रुपचे सदस्य आहेत. हे सर्वजण यंदाच्या आवृत्तीतही सहभागी होण्यास उत्सुक आहेत. स्ट्रायडर्स ग्रुपमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या ११ जणांनी जगात अवघड मानली जाणारी दक्षिण आफ्रिकेमधील ‘कॉम्रेड्स’ ही स्पर्धा आपल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये पूर्ण केली आहे. यातील काही धावपटू यंदा मुंबईत धावताना दिसतील.

मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांमध्ये धावण्याची संस्कृती निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम सध्या स्ट्रायडर्स ग्रुपतर्फे केले जात आहे. त्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्थूलपणा कमी करण्यासाठी या ग्रुपद्वारे गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *