उत्तरप्रदेशमध्ये नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी रेल्वे अपघाताचा कट ?

उत्तरप्रदेशमधील कानपूरजवळ समाजकंटकांनी रेल्वे रुळ कापण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. कानपूरजवळील मंधना स्थानकाजवळ रेल्वे रुळ कापण्यात आले होते आणि फिशप्लेट्स काढून ठेवण्यात आले होते. सुदैवाने हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला. पण मोदींच्या सभेपूर्वी जाणूनबुजून रेल्वे अपघात घडवण्याचा कट रचल्याचा संशय आता व्यक्त होत आहे. यापूर्वी कानपूरमध्येच मोदींच्या सभेच्या काही तासांपूर्वी भीषण रेल्वे अपघात झाला होता आणि सुमारे १४० प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

रविवारी कानपूरजवळील मंधना स्थानकाजवळ काही अज्ञात व्यक्ती  रेल्वे रुळ कापण्याचा प्रयत्न करत होते. गस्त घालणा-या पथकाला बघून या तरुणांनी पळ काढला. घटनास्थळी रेल्वे रुळाची पाहणी केली असता फिशप्लेट्स काढल्याचे समोर आले होते. तसेच रेल्वे रुळही कापण्यात आला होता. या घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला देण्यात आली असून त्यांनी तपासही सुरु केला आहे. घटनेनंतर या भागात सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे गाड्यांचा वेगही कमी करण्यात आला आहे.

कानपूरमधील या घटनेचा संबंध आता थेट नरेंद्र मोदींच्या सभेशी जोडला जात आहे. उत्तरप्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यातील दौरे वाढले असून प्रचार सभांचा झंझावात त्यांनी सुरु केला आहे. मात्र मोदींच्या या दौ-यांपूर्वी जाणूनबुजून रेल्वे अपघात घडवले जात आहे का असा सोशल मीडियावर उपस्थित होत आहे. अंकूर सिंह या तरुणाने सोशल मीडियावर हा प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या महिन्यात मोदींच्या कानपूरमधील सभेपूर्वीही रेल्वे अपघात झाला होता याकडे अंकूरने लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे अंकूरच्या या ट्विटला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही रिट्विट केल्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे. सोमवारी मोदी लखनौमध्ये सभा घेणार आहेत.

कानपूरमध्ये गेल्या दोन महिन्यात दोन मोठे रेल्वे अपघात झाले होते. २८ डिसेंबरला कानपूरजवळ रुरा स्थानकाजवळ अजमेर एक्सप्रेसचे १५ डबे रुळावरुन घसरले होते. यात ५० प्रवासी जखमी झाले होते. तर २० नोव्हेंबररोजी पुखारियामध्ये झालेल्या अपघातात १४० जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही मोदींनी कानपूरमध्ये सभा घेतल्याने त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *