बाजारात सोबत नवरा नाही म्हणून महिलेचा केला शिरच्छेद

अफगाणिस्तानच्या काही भागात अजूनही महिलांवर कठोर निर्बंध आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन होताच महिलांच्या बाबतीत क्रौर्याची परिसीमा गाठली जाते. अफगाणिस्तानातील दुर्गम लात्ती गावात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या गावातील एक महिला एकटी बाजारात आली म्हणून सशस्त्र हल्लेखोरांनी महिलेचा शिरच्छेद केला.
सर-इ-पूल प्रांतातील लात्ती गावात ही घटना घडली. या गावामध्ये तालिबानची राजवट आहे. ही महिला नव-याला सोबत न घेता एकटी खरेदीसाठी बाहेर गेली म्हणून तिची हत्या करण्यात आली असे सर-इ-पूल प्रांताचे राज्यपाल झबीउल्लाह अमानी यांनी सांगितले.  या महिलेचा नवरा इराणमध्ये नोकरी करतो.
तालिबानच्या राजवटीत महिलांना जवळचा पुरुष नातेवाईक सोबत नसेल तर घराबाहेर पडण्यावर बंदी आहे. शिकण्यावर, नोकरी करण्यावर बंदी असून त्यांना जबरदस्तीने बुरखा घालावा लागतो. या घटनेशी आपला काही संबंध नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अफगाण विमानतळावर सुरक्षा रक्षकाची नोकरी करणा-या पाच महिलांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *