ठाण्यात तब्बल ८ कोटी रुपयांचे युरेनियम जप्त करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. ठाणे गुन्हे शाखेने घोडबंदर रोडवर सापळा रचून ही कारवाई केली असून दोन जणांना या प्रकरणी अटक केली आहे.
घोडबंदर रोडवरील बाईक हॉटेलजवळ दोन इसम युरेनियम विकण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र डोईफोडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून दोन इसमांना ताब्यात घेतले.
त्यांची झडती घेतली असता त्यापैकी एकाकडे निळ्या रंगाच्या पाऊचमध्ये कार्बन पेपर आणि निळ्या मखमली कपड्यात गुंडाळलेला धातूचा तुकडा आढळला. तर दुस-याकडे प्लास्टिकच्या पिशवीत पुठ्ठय़ाच्या बॉक्समध्ये कार्बन पेपर आणि निळ्या मखमली कापडात गुंडाळलेले धातूचे तुकडे आढळले. तसेच एका लिफाफ्यामध्ये प्रयोगशाळेचे २ अहवालही सापडले असून त्यात युरेनियमचे प्रमाण ८७.७० टक्के आणि ७९.५०५ टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या युरेनियमचे एकत्रित वजन ८ किलो ८६१ ग्रॅम इतके असून ते बाजारात विक्रीसाठी मिळत नसले, तरी त्याची किंमत ८ कोटी रुपयांच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
युरेनियमचा वापर हा प्रामुख्याने अणुउर्जा निर्मिती, तसेच अण्वस्त्रांच्या निर्मितीत होत असल्याने या धातूला मोठे महत्त्व आहे. त्यात हा धातू ठाण्यात सापडल्याने या दोघांचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग आहे का? किंवा तशा कृत्यासाठी हे युरेनियम वापरले जाणार होते का? या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
