देशात हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचे उत्तम उदाहरण देणारी आणखी एक घटना समोर आली आहे. ब्रेन डेड झालेल्या आसिफ जुनेजा यांचे हृदय त्यांच्या कुटुंबीयांनी अर्जन अंबलिया या हिंदू व्यक्तीला देऊन त्यांना जीवनदान दिले आहे. सोमवारी भावनगरहून विमानाच्या सहाय्याने जुनेजा यांचे हृदय अहमदाबाद येथे आणण्यात आले. यानंतर अंबलिया यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाचे ऑपरेशन करण्यात आले.
भावनगरच्या चॅरिटेबल हॉस्पिटलमधील न्युरोसर्जन डॉक्टर राजेंद्र कबारिया यांना सांगितले की, ‘आम्ही जुनेजा यांच्या कुटुंबीयांना अवयव दान करण्याबाबतची माहिती दिली आणि याला सकारात्मक प्रतिसाद देत अवयव दान करण्यासाठी ते तयारदेखील झाले. हृदयव्यतिरिक्त त्यांनी दोन्ही किडनी, यकृत आणि स्वादुपिंड हे चार अवयव गरजूंना दान केले.’
दरम्यान, गुजरातमध्ये हृदय प्रत्यारोपणाचे करण्यात आलेले हे पहिलेचे ऑपरेशन असल्याची माहिती समोर आली आहे. 17 डिसेंबर रोजी जुनेजा हे रस्ता ओलांडत असताना भरधाव येणा-या गाडीच्या धडकेत गंभीररित्या जखमी झाले होते. यानंतर भावनगरमधील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले मात्र 20 डिसेंबर रोजी त्यांचे ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोमवारी सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी चार्टर्ड विमानातून जुनेजा यांचे हृदय रवाना झाले.
भावनगर सिटीपासून विमानतळ आणि हॉस्पिटलपर्यंत ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला होता. यानंतर सकाळी 9.30 वाजता सुरू करण्यात आलेली शस्त्रक्रिया जवळपास 4 तासांनी यशस्वीरित्या पार पडली. अशा पद्धतीने आसिफ यांनी अर्जन यांना हृदय देऊन त्यांचा जीवनाचा ठोका चुकू दिला नाही. याद्वारे देशात हिंदू-मुस्लिम ऐक्य जपले जाणारे आणखी एक जिवंत उदाहरणदेखील समोर आले आहे.
