दक्षिण चीन सागरात आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेमध्ये तैनात असलेले अमेरिकी ड्रोन चीनी नौदलाने ताब्यात घेतले आहे. अमेरिकेने चीनच्या या कारवाईचा निषेध नोंदवताना जप्त केलेले ड्रोन पुन्हा ताब्यात देण्याची मागणी केली आहे. जप्त केलेले मानवरहीत ड्रोन नियमानुसार पाण्याखाली लष्करी सर्वेक्षण करीत होते असे अमेरिकन अधिका-यांनी म्हटले आहे.
चीनच्या या कृत्यामुळे दक्षिण चीनच्या समुद्रात अमेरिका आणि चीनमध्ये तणाव आणखी वाढणार आहे. दक्षिण चीन समुद्राच्या मालकी हक्कावरुन चीनचा आसपासच्या शेजारी देशांबरोबर वाद सुरु आहे. त्यामुळे अमेरिकेने आपले नौदल दक्षिण चीन समुद्रात उतरवले आहे.
चीनने दक्षिण चीन सागरात बांधलेल्या सात कृत्रिम बेटांवर लष्करी सज्जता ठेवल्याचे उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रातून दिसत असल्याचे अमेरिकन थिंक टॅंकने म्हटले आहे. चीनने जप्त केलेले ड्रोन समुद्राची माहिती गोळा करण्यासाठी तैनात करण्यात आले होते. तापमान, पाण्याची स्वच्छता अशा माहितीचा त्यामध्ये समावेश होता असे अमेरिकन अधिका-यांनी सांगितले.
