-
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हॅकिंगच्या माध्यमातून रशियाने केलेला हस्तक्षेप अजिबात सहन करणार नाही. आम्ही आमच्या सोयीनुसार वेळ आणि ठिकाण ठरवून रशियाला याचे उत्तर देऊ असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नॅशनल पब्लिक रेडिओलो दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरु असताना रशियाने संगणकातील गोपनीय माहितीचे हॅकिंग केल्याचे अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि रशिया परस्परांचे कट्टर विरोधक आहेत. पण या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी निवडणूक आणण्याचे रशियाचे उद्दिष्टय होते.
त्यासाठी रशियन हॅकर्सनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नॅशनल कमिटीच्या कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये तसेच जॉन पोडेस्टा यांचे खासगी ईमेल हॅक केले. जॉन डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांचे प्रमुख सल्लागार होते. रशियाने या हॅकिंगच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांना माहिती पुरवली. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हे ईमेल प्रकरण निर्णायक ठरले.
ट्रम्प यांनी हिलरी विरोधात हा मुद्दा बनवला. ज्याचा त्यांना फायदा झाला. मुलाखतीत ओबामांनी सीआयएच्या विश्लेषणाबद्दल फार माहिती दिली नाही. जेव्हा दुसरा देश तुमच्या निवडणूकप्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करतो तेव्हा उत्तर देणे आवश्यक असते आणि आम्ही ते देणार. वेळ आणि ठिकाण आमच्या सोयीनुसार ठरवू असे ओबामांनी सांगितले.