मानखुर्दमध्ये सिलेंडरच्या स्फोटामुळे घर कोसळून तिघांचा मृत्यू; १२ जण जखमी

मुंबईच्या मानखुर्द परिसरात गुरूवारी गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. मानखुर्द रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या महाराष्ट्र नगर परिसरात ही दुर्घटना घडली. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा आणि चिंचोळा आहे. त्यामुळे याठिकाणी दाखल झालेल्या अग्निशामन दलाला मदतकार्यात अडथळे येत आहेत. आज पहाटे ही घटना घडली. सकाळची वेळ असल्यामुळे घरातील सर्वजण झोपले होते. यावेळी घर अचानक कोसळल्यामुळे तीनजण ढिगाऱ्याखाली दबून जागीच ठार झाले. घर कोसळल्याने बाजूच्या घरांनाही तडे गेले आहेत. महाराष्ट्र नगर खाडीवर वसलेले असल्याने भूसभूशीत जमिनीमुळे ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येते.  यावेळी अनेकजण घराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यापैकी १२ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून रूग्णालयात नेण्यात आले. यापैकी दोघाजणांचा काही वेळापूर्वीच मृत्यू झाला आहे. जखमींवर गोवंडीच्या शताब्दी आणि घाटकोपरच्या राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो. अग्निशमन दलाचे जवान उर्वरित लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामन दलाच्या दोन गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे इमारत कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *