राष्ट्रगीतासाठी उभे न राहिल्याने तिघांना मारहाण

चित्रपटगृहात राष्ट्रगीतासाठी उभे न राहिल्याने चेन्नईत तिघांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाण झालेल्यांमध्ये एका तरुणाचा आणि दोन महिलांचा समावेश आहे. जवळपास २० जणांकडून ही मारहाण करण्यात आली आहे. चेन्नईतील अशोक नगरमधील कासी चित्रपटगृहात हा प्रकार घडला आहे.

रविवारी चेन्नईतील कासी चित्रपटगृहात ‘चेन्नई २८-ll’ हा चित्रपट दाखवला गेला. या चित्रपटाच्या मध्यतरांवेळी हा प्रकार घडला. यावेळी २० जणांचा तिघांसोबत वाद झाला. चित्रपटाआधी राष्ट्रगीत सुरू असताना नऊ जण उभे न राहिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

चित्रपटाच्या मध्यंतरादरम्यान विजयकुमार नावाच्या व्यक्तीने चित्रपट समीक्षक असलेल्या विजी नावाच्या व्यक्तीची कॉलर धरली आणि राष्ट्रगीतावेळी का उभा राहिला नाहीस, असा प्रश्न विचारला. त्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला. यानंतर २० जणांनी विजीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या २० जणांनी सबरिथा आणि श्रीला या दोन महिलांनादेखील मारहाण केली.

‘आम्हाला त्रास देण्यात आला. याशिवाय आम्हाला धक्काबुक्कीदेखील करण्यात आली. त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी देत मारहाणदेखील केली. राष्ट्रगीताचा अवमान करण्याची कोणताही भावना आमच्या मनात नव्हती,’ असे कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या श्रीलाने म्हटले आहे.

राष्ट्रगीतावेळी उभे न राहणाऱ्यांना त्याबद्दल जाब विचारणारा विजयकुमार प्रशासकीय सेवेत काम करण्यासाठी इच्छुक आहे. प्रशासकीय परिक्षांची तयारी करणाऱ्या विजयकुमारने विजी आणि दोन महिलांच्या वर्तणुकीवर आक्षेप घेतला आहे. ‘राष्ट्रगीत सुरू असताना ते लोक सेल्फी काढत होते. उपस्थित असणाऱ्या अनेकांना त्यांचे वर्तन आवडले नाही,’ असे विजयकुमारने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *