हिंदी चित्रपटांचे युगपुरुष, ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार उर्फ दाद मुनी यांचा आज (१० डिसेंबर) स्मृतिदिन.
१३ ऑक्टोबर १९११ रोजी बिहारच्या भागलपूरमध्ये जन्मलेल्या अशोक कुमार यांचे मूळ नाव कुमुद कुमार गांगुली. नेहमी चेह-यावर स्मित हास्य असलेल्या अशोक कुमार यांचे पात्र प्रेक्षकांना खास पसंत होते.
अशोक कुमार यांचा जन्म एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. वकील कुंजलाल गांगुली यांचा मोठा मुलगा अशोक कुमार पुढे एक अभिनेते बनले. ते आपले छोटे भाऊ अनूप कुमार आणि किशोर कुमार यांच्यासाठी एक प्रेरणा बनले.
किशोर कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की त्यांनी अभिनयासह गायनाची प्रेरणादेखील आपले मोठे भाऊ अशोक कुमार यांच्याकडून घेतली होती. कारण बालपणीपासूनच अशोक यांनी किशोर यांना गायनाचे धडे दिले होते. तिन्ही भावांनी ‘चलती का नाम गाडी’ सिनेमात एकत्र काम केले होते. हा सिनेमा सुपरहिट झाला होता.
अशोक कुमार यांना सुपरहिट अभिनेता नव्हे एक हिट दिग्दर्शक होण्याचे स्वप्न होते. १९३४ मध्ये अशोक कुमार यांनी मुंबईच्या न्यू थिएटरमध्ये लॅबोरेटरी सहायक म्हणून कामास सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे भाऊजी आणि मित्र शशिधर मुखर्जी यांनी त्यांना बॉम्बे टॉकीज स्टुडिओमध्ये काम करण्यासाठी बोलावले. त्यानंतर या स्टुडिमध्ये काम करत असताना १९३६ मध्ये ‘जीवन नैया’ मधून अशोक कुमार यांनी अभिनेता म्हणून फिल्मी करिअरला सुरुवात केली. या सिनेमातील मुख्य नायक नज्म उल हसन अचानक आजारी पडल्याने अशोक कुमार यांना या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर ‘कंगन’, ‘बंधन’ आणि ‘झूला’ सिनेमांतील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळाली. असे करत अभिनेता म्हणून अशोक कुमार फिल्मी इंडस्ट्रीमध्ये स्थापित झाले.
एका अभिनेता म्हणून अशोक कुमार यांनी स्वत:ची खास शैली विकसित केली. त्यांनी अभिनयात विविध प्रयोग केले आणि पहिल्यांदा हिंदी सिनेमांमध्ये अँटी हिरोच्या पात्राचा ट्रेंड त्यांनी सुरु केला.
बॉम्बे टॉकीजपासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी स्वत:ची एक प्रॉडक्शन कंपनी सुरु केली. त्यांनी ज्यूपिटर थिएटरसुध्दा खरेदी केले होते. जवळपास तीन वर्षे सिनेमा निर्मितीमध्ये तोटा झाल्यानंतर त्यांनी प्रॉडक्शन कंपनी बंद केली. अभिनेत्री नूतन यांच्या सांगण्यावरून अशोक यांनी बिमलरॉय यांच्या ‘बंदिनी’ (१९६३) सिनेमात काम केले. हा सिनेमा हिंदी सिनेमांच्या इतिहासातील क्लासिक सिनेमांमध्ये सामील झाला. स्वत:चे चरित्र आणि उत्कृष्ट अभिनय जपवून ठेवण्यासाठी अशोक कुमार यांनी विविध भूमिका साकारल्या. १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चलती का नाम गाडी’ सिनेमातील त्यांच्या अभिनयाने त्यांना उंच शिखरावर नेले. १९६८ मध्ये आलेल्या ‘आशीर्वाद’ सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बॉम्बे टॉकीजच्या बॅनरखाली तयार झालेल्या प्रॉडक्शन चीफ अशोक कुमार यांनी ‘मशाल’, ‘जिद्दी’ आणि ‘मजबूर’ सारखे अनेक सिनेमे बनवले. १९४९ मध्ये प्रदर्शित सुपरहिट ‘महल’ची निर्मिती केली. त्यांच्या या सिनेमाने अभिनेत्री मधुबालासह पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनासुध्दा शिखरावर पोहोचवले.
१९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ज्वॅलथीफ सिनेमात त्यांनी पहिल्यांदा खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांसमोर नवीन रुप सादर केले होते. १९८४ मध्ये दूरदर्शनच्या इतिहासात पहिल्यांदा एका मालिकेच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसले. दूरदर्शनच्या भीम भवानी, बहादुर शाह जफर आणि उजाले की ओर या मालिकांत त्यांनी काम केले होते. अशोक कुमार यांना दोन सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८८ मध्ये हिंदी सिनेमातील प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारने त्यांना गौरविण्यात आले. जवळपास ६ दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अशोक कुमार यांनी राज्य केले.
आज अशोक कुमार यांची आठवण काढण्याचे कारण म्हणजे, त्यांची आज (१० डिसेंबर) पुण्यातिथी आहे. १० डिसेंबर २००१ मध्ये अशोक कुमार यांनी जगाचा निरोप घेतला.
