अंदमानमध्ये अडकले 1400 पर्यटक, वादळामुळे बचावकार्यात अडथळा

अंदमान बेटाला वादळाचा तडाखा बसल्याने जवळपास 1400 हून अधिक पर्यटक अडकल्याची माहिती मिळते आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. ‘हॅवलॉक बेटावर अडकलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून पर्यटकांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सरकार संपूर्ण प्रयत्न करत आहे’, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.  वादळाची तीव्रता जशी कमी होईल, तसे लवकरात लवकर बचाव कार्य सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.  भारतीय नेव्हीकडून हॅवलॉकमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर आणण्यासाठी चार जहाजांचा वापर करण्यात येत आहे. मात्र खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
अंदमानमधील हॅवलॉक बेट लोकप्रिय पर्यटन स्थळ असून पर्यटकांची ने-आण करण्यासाठी जहाज किंवा हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येतो. मात्र सोमवारी रात्री खराब हवामानामुळे ही सेवा थांबण्यात आली. दक्षिण अंदमानच्या उपायुक्तांनी सांगितले की, बेटावर जवळपास 1400 पर्यटक अडकले असून घरी परतण्यासाठी त्यांना पोर्ट ब्लेअर याठिकाणी येण्यासाठी वादळामुळे अडचण निर्माण झाली आहे. बेटावरील स्थानिकांनाही वादळाचा तडाखा सहन करावा लागतो आहे. जीवनावश्यक वस्तू मिळवणे त्यांना कठिण झाले आहे.  अंदमान प्रशासनाच्या अधिका-यांनी सांगितले की, वादळामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला असून काही परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी मोबाइल सेवादेखील पूर्णपणे खंडित झाली आहे. या  सर्व अडचणींमुळे बचावकार्य सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *