इंडोनेशियाच्या असेह प्रांतात आज सकाळी सागरात झालेल्या शक्तिशाली भूकंपात ९७ जण ठार झाले असून ढिगाऱ्यातून लोकांना काढण्याचे काम सुरू आहे. या भूकंपाने अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. मेजर जनरल ततांग सुलेमान यांनी सांगितले की, भूकंपाच्या केंद्रस्थानाजवळ असलेल्या पिडी जया जिल्ह्य़ात ५२ जण ठार झाले आहेत तर इतर दोन जण बिरेन जिल्ह्य़ात मरण पावले. राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेने सांगितले की, या भूकंपात ७८ पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
गांवकरी, सैनिक व पोलीस मेरूडू येथे मदतकार्य करीत असून पिडी जया जिल्ह्य़ातील या गावास मोठा फटका बसला आहे. ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. जिल्ह्य़ात किमान चाळीस इमारती कोसळल्या असल्याचे जिल्हा प्रमुख अयुब अब्बास यांनी सांगितले. अनेक रस्त्यांना तडे गेले असून विजेचे खांबही कोसळले आहेत.
अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार तेथील वेळेनुसार पहाटे ५ वाजून ३ मिनिटांनी हा भूकंप झाला व त्याची तीव्रता ६.५ रिश्टर होती. त्याचे केंद्र उत्तर असेहमधील रूलेट गावाच्या उत्तरेला १० कि.मी अंतरावर होते व त्याची खोली १७ कि.मी होती. या भूकंपामुळे सुनामी लाटा आल्या नाहीत. २६ डिसेंबर २००४ रोजी असेहमध्ये भूकंपात एक लाख लोक ठार झाले होते व त्यावेळी सुनामी लाटा उसळल्या होत्या.
मेरूडूचे रहिवासी मुसमान अझीज यांनी सांगितले की, २००४ इतकाच मोठा धक्का आताचाही होता. राजधानी जाकार्तामध्ये अध्यक्ष जोको जोकोवी विडोडो यांनी सांगितले की, सर्व सरकारी यंत्रणांना मदतकार्यात सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.
पिडी जया येथील रहिवासी फित्री अबिदीन हिने सांगितले की, मी पती व मुलांसह पळाले. आम्ही डोंगरावर जाऊन बसलो होतो व बराच काळ तेथे बसून होतो.
भूकंपाने श्वास घेणे जड जात होते व चालणेही अवघड होते. पतीने मला ढिगाऱ्यातून बाहेर काढले. आमचे तीन मित्र ढिगाऱ्याखाली गाडले गेले असे तिने सांगितले.