पाकिस्तानातील कराची येथील ‘रेजंट प्लाझा हॉटेल’मध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 65 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती बचाव पथकाच्या अधिका-यांनी दिली आहे. सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली आहे. तळमजल्यावरील स्वयंपाक घरात भीषण आग लागल्यानंतर ही आग पसरुन सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. हॉटेलमधील अतिथीगृहालाही आगीने वेढा घातला. यामुळे ग्राहकांमध्ये भीती निर्माण होऊन पळापळा सुरू झाली, अशी माहिती ‘डॉन’ वृत्तपत्राने दिली.
यानंतर फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरू केले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आले. जिव वाचवण्यासाठी काही जणांनी हॉटेलमधून उड्या मारण्याचा प्रयत्न केला, तर आगीमुळे इमारतीच्या फुटलेल्या काचा काहींच्या शरीरात घुसून जवळपास 65 जण या घटनेत जखमी झाले असून सुरक्षा विभागाने आग शमवण्यासाठी फवारलेल्या धुरामुळे काही जण प्रभावित झाल्याची माहिती मिळत आहे.
जखमींमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती आहे. दरम्यान, या भीषण दुर्घटनेमागील नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे.