एड्सबाधित लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: त्यांच्याविषयी केला जाणारा भेदभाव, कलंक कमी करण्यासाठी सर्व स्तरांतील लोकांत जागृती निर्माण करायला हवी. एचआयव्हीला केवळ मुंबईतून वा देशातूनच नव्हे, तर जगातून हद्दपार करण्याचे आवाहन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
जागतिक एड्स दिनाचे निमित्त साधून ‘एकत्र येऊ एचआयव्हीचा मुकाबला करू’ या संकल्पनेस अनुसरून मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत समाजाच्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. के.ई.एम. रुग्णालयात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात महापौरांच्या हस्ते एड्सचा मुकाबला करण्यासाठी दोन अॅप्लिकेशन्सचे अनावरण करण्यात आले. ‘मैत्र’ या अॅपच्या माध्यमातून एड्सबाधितांना रोजच्या उपचारांची आठवण, एआरटी केंद्राच्या भेटीबद्दलचा तपशील आणि वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर मार्गदर्शन मिळणार आहे. तर ‘आय-चेक’ अॅपद्वारे मुंबईतील शक्ती क्लिनिक, सुरक्षा क्लिनिक व एआरटी केंद्रांची माहिती मिळेल. या वेळी झेविअर्स कम्युनिकेशन्सच्या लघुचित्रपट स्पर्धेचा आणि एआरटी उपचार केंद्रासाठी रक्त नमुने कुरिअर सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी, उपमहापौर अलका केरकर, अतिरिक्त मनपा आयुक्त आय.ए. कुंदन, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम, प्रभाग समिती अध्यक्ष हेमांगी चेंबूरकर, वैद्यकीय शिक्षण प्रमुख आणि बी.वाय.एल. नायर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. भारमल, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या प्रकल्प संचालिका डॉ. पद्मजा केसकर, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या अतिरिक्त प्रकल्प संचालिका श्रीकला आचार्य उपस्थित होत्या.
या वेळी, अतिरिक्त मनपा आयुक्त आय.ए. कुंदन म्हणाल्या की, किशोरवयीन गटात एचआयव्ही संसर्गावर जास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तसेच, स्थलांतरितांच्या समस्यांसाठी सॉफ्टवेअर ट्रेकिंग सिस्टीम तयार केले पाहिजे.
