रूम देण्याचे आमिष दाखवून कळव्यातील तिघांकडून १५ लाख ९२ हजारांची रोकड घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या जाधव दाम्पत्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कळव्यातील राजेंद्र उतेकर यांना बांधकाम व्यावसायिक संजय जाधव याने रूम देतो, असे सांगून त्यांच्याकडून दोन लाख ८० हजार घेतले. वरळीनाका येथील प्रेमनगर झोपडपट्टीतील शोभा मासाळ यांनाही विटाव्यातील सूर्यनगर येथील साई पोशा अपार्टमेंट या इमारतीमध्ये सदनिका क्रमांक देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आठ लाख १२ हजार घेतले. त्या सदनिकेचे वीजबिल आणि करपावती शोभा यांच्या नावाने करून तिचा ताबा त्यांना न देता दुसऱ्यालाच म्हणजे प्रभाकर मोरे यांना देत मासाळ यांची फसवणूक केली. एप्रिल २०१५ रोजी संजय आणि त्याची पत्नी मनीषा यांनी विटाव्यातील कुंकाई मंदिराजवळील मोकळ्या जागेत चाळ बांधून त्या ठिकाणी मोठी खोली देण्याचे आमिष दाखवून आणखी एका दाम्पत्याकडून पाच लाखांची रोकडही त्यांनी घेतली.
