नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक एजंट काळा पैसा पांढरा करीत असल्याची चर्चा आहे. काळ्या पैशावाल्यांना पैसा पांढरा करून घेण्याची घाई असल्यामुळे ते एजंटाची पार्श्वभूमी तपासत नाहीत. परिणामी, एजंट खोट्या नोटा माथी मारून त्यांची फसवणूक करीत आहेत. अशाच दोन एजंटांची ही कहाणी. हे एजंट नात्याने बहीण-भाऊ आहेत.
चंदीगडमध्ये दोन हजार रुपयांच्या तब्बल दोन कोटी रुपयांच्या बनावट नोटा छापल्याबद्दल बी.टेक.चा विद्यार्थी अभिनव वर्मा (२१) आणि त्याची चुलत बहीण विशाखा वर्मा (२०) यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ स्कॅनरच्या मदतीने बनावट नोटा छापल्या.
नोटाबंदीनंतर २ हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यानंतर या दोघांनी त्यांची नक्कल करणे सुरू केले. प्राथमिक टप्प्यात अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर अखेर बाजारात चालू शकतील अशा हुबेहूब अस्सल नोटांसारख्या नोटा छापण्यात त्यांना यश आले. त्यानंतर त्यांनी बनावट नोटा छापण्याचा धडाकाच लावला. करोडपती होण्याच्या कल्पनेने दोघांनाही पछाडले होते. त्यांनी २ हजार रुपयांच्या तब्बल २ कोटी रुपयांच्या नोटा काळा पैसाधारकांना वितरित केल्या. एवढेच नाही तर त्यांनी बनावट नोटांद्वारेच २० लाख रुपयांची जुनी कारही विकत घेतली. या दोघांचे चंदीगड औद्योगिक वसाहतीत कार्यालय असल्याचे चौकशीत उघड झाले. पोलिसांनी तेथे धाड टाकून ३ कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या. आपण ६ काळ्या पैशेवाल्यांना फसविल्याचे या दोघांनी सांगितले. हे दोघे पोलीस कोठडीत असून, त्यांनी ज्या सहा जणांना फसविले त्यांचा शोध सुरू आहे. लुबाडले गेल्याचे लक्षात आल्यानंतरही मामला चोरीचा असल्यामुळे काळ्या पैशावाले तक्रार करीत नाहीत.
४.७ कोटींच्या नव्या नोटा जप्त : प्राप्किर विभागाने बुधवार आणि गुरुवारी कर्नाटक व गोव्यात दोन ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये एकूण सहा कोटींहून अधिक रोकड, कित्येक किलो सेने व चांदी आणि अनेक आलिशान मोटारी जप्त केल्या. जप्त केलेल्या नोटांमध्ये सुमारे ४.७ कोटी रुपयांच्या नोटा दोन हजारांच्या नव्या नोटा होत्या, सरकारी सेवेतील दोन अभियंते व दोन कंत्राटदारांवरील धाडींमध्ये हे घबाड मिळाले. याखेरीज सात किलो सोन्याच्या चिपा, सात किलो सोन्याचे दोगिने व लॅम्बॉगिर्नीसह अनेक महागड्या मोटारीही हाती लागलेल्या बेहिशेबी संपत्तीत आहेत.
