लाचखोर महिला उपजिल्हाधिकारी अटकेत

अंबडच्या उपविभागीय अधिकारी सविता चौधर-पालवे व एका खासगी व्यक्तीला ३ लाखांची लाच घेताना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाचेच्या रकमेत ५० हजारांच्या नव्या तर अडीच लाखांच्या जुन्या नोटांचा समावेश आहे.

अंबड- घनसावंगी तालुक्यात गोदापात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा होत आहे. वाळू उपशामुळे नदीपात्रात खड्डेच खड्डे झालेले आहेत. ग्रामस्थांनी वाळूउपशाला विरोध करूनही वाळू वाहतूक होत आहे. गेल्या आठवड्यात अंबड व घनसावंगीच्या महसूल पथकाने अवैध वाळू उपसा करून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. यातील दोन ट्रक जप्त करून त्यांच्यावर कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी सविता चौधर यांच्याकडे अहवाल पाठविण्यात आला होता.

जप्त वाहने सोडण्यासाठी वाळू वाहतूकदार ट्रक मालकांकडे चौधर यांनी ८ लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती ५ लाख रूपयांची लाच घेण्याचे चौधर यांनी मान्य केले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार वाहतूकदाराने यासंबंधी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रार दाखल होताच या विभागातील पथकांनी अत्यंत गुप्तपणे लाचेच्या मागणीची पडताळणी करून सापळा लावला. पाच लाखांपैकी ३ लाखांची रक्कम घेताना चौधर आणि खाजगी इसम सखाराम शिंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *