प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात मंगळवारी भारताचे तीन जवान शहीद झाले. या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे ११ जण ठार झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले.
मच्छल क्षेत्रात तीन जवान शहीद झाल्यानंतर लष्कराने प्रत्युत्तर देण्यासाठी मोहीम सुरू केली, अशी माहिती लष्कराच्या उत्तर विभागाचे ब्रिगेडियर जनरल स्टाफचे ब्रिगेडियर पी. एस. गोत्रा यांनी दिली. लष्कराने पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून जोरदार कारवाई सुरू केली आहे.
नीलम खो-यात भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात बसमधील नऊ प्रवासी ठार झाल्याची माहिती पाकिस्तानचे अधिकारी वाहीद खान यांनी दिली. तर पाकव्याप्त काश्मीरातील नख्याल विभागात दोन जण ठार झाले. पाकिस्तानी लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भिंबर गेली, कृष्णा घाटी, नौशेरा क्षेत्रात बुधवारी गोळीबार केला. यात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले.
सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, सकाळी ९.४५ पासून राजौरी जिलतील भिंबर गली भागात पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे.
