वांद्रे येथे अज्ञातांकडून एटीएम कॅश व्हॅन लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुरक्षारक्षकाने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे लुटीचा हा प्रयत्न फसला आणि चोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. आयसीआयसीआय बँकेच्या पाली नाका एटीएमजवळ हा चोरीचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या पाली नाका एटीएमजवळ दोन अज्ञातांनी चाकूचा दाख दाखवत लुटीचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकाने आपल्याजवळील बंदूक हातात घेताच दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या चोरांची ओळख अद्याप पटलेली नसून वांद्रे पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नोटाबंदीमुळे पैसे काढण्यासाठी एटीएम आणि बँकांबाहेर रांगा लागत आहेत. त्यामुळे अनेक जणांचे बळीदेखील गेले आहेत. अशातच ही घटना घडल्यामुळे लुटीमागे नोटाबंदीचं कारण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
