सुषमा स्वराज यांचे मूत्रपिंड निकामी, एम्समध्ये उपचार सुरू

सुषमा स्वराज यांचे मूत्रपिंड निकामी, एम्समध्ये उपचार सुरू

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मूत्रपिंड निकामी झाले असून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खुद्द सुषमा स्वराज यांनी स्वतः ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

सुषमा स्वराज यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत सुषमा स्वराज यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. सुषमा स्वराज यांनी बुधवारी सकाळी ट्विटरवरुन त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. ‘मी सध्या डायलिसिसवर आहे. किडनी प्रत्यारोपणासाठी चाचणीही सुरु आहे’ असे स्वराज यांनी सांगितले. स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया कधी होईल हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरु होणार असून या अधिवेशनात सुषमा स्वराज यांच्या अनुपस्थितीविषयी प्रश्न उपस्थित झाले असते. त्या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज यांनी स्वतःच ट्विटरवरुन प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

गेल्या महिन्यात सुषमा स्वराज यांना संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. सुषमा स्वराज यांच्या भाषणाचे सर्वांनीच कौतुक केले होते. मात्र तिथून भारतात परतल्यापासून सुषमा स्वराज यांची प्रकृती खालावली होती. सुषमा स्वराज यांना यापूर्वी दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीविषयी शंका उपस्थित होत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *