अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व बिगर राजकारणी व उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून ट्रम्प हे अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष बनणार आहेत.
दहशतवादाला आळा, स्थलांतरितांवर अंकुश व स्थानिकांना रोजगार या ट्रम्प यांच्या आश्वासनांनी मतदारांना भुरळ घातली. उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी अवघ्या १८ महिन्यांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. आपल्या वादग्रस्त बोलण्याने व बेफाम वक्तव्यांनी त्यांनी जगभरात खळबळ उडवून दिली.
ट्रम्प व क्लिंटन यांच्यात चुरस होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ट्रम्प यांनी २८९ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला तर क्लिंटन यांना केवळ २१८ मते मिळाली. ट्रम्प विजयी झाल्याने जगभरात साशंकतेचे वातावरण आहे. कारण अमेरिकन नागरिकांना नोक-या मिळवून देण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले आहे. ट्रम्प यांना पेनिसिल्विनिया, ओहियो, फ्लोरिडा, टेक्सास, नॉर्थ कॅरोलिना या राज्यांनी मोठा हात दिला.
विजयी झाल्यानंतर समर्थकांसमोर भाषण करताना ट्रम्प म्हणाले की, आपण सर्वानी एकत्र राहण्याची वेळ आली आहे. मी सर्व अमेरिकन नागरिकांचा अध्यक्ष असेन. देशाची पुनर्बाधणी करण्याचे काम आपण तातडीने हाती घेणार आहोत. अमेरिकेत मोठी क्षमता आहे. पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे. या कामासाठी शेकडो जणांची गरज लागणार आहे, असे त्यांनी सांगितले. क्लिंटन यांचे ‘ई-मेल’ प्रकरण बाहेर काढण्याची घोषणा एफबीआयने केली. अखेरच्या क्षणी त्यांना क्लीनचिट दिली. मात्र, त्याला विलंब झाला होता. जनतेचे मत ट्रम्प यांच्याकडे झुकले.
पहिल्याच भाषणात सामोपचाराचा सूर
न्यूयॉर्क- निवडणुकीच्या प्रचारात वादळी व वादग्रस्त विधाने करणारे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांना आपला सूर मवाळ केला आहे. जागतिक महासत्तेच्या या प्रस्तावित अध्यक्ष ट्रम्प यांनी संपूर्ण देशाला एकतेचा संदेश दिला आहे. विजयी झाल्यानंतर समर्थकांसमोर भाषण करताना ट्रम्प म्हणाले की, राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी माझे अभिनंदन केले. मीही त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी सार्वजनिक जीवनात दिलेले प्रदीर्घ योगदान विसरता येणार नाही.
संपूर्ण निवडणूक प्रचारात जातीयतेचा आरोप होणा-या ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर देशातील सर्व स्तरातील नागरिकांना बरोबर घेऊन जाणार असल्याचे जाहीर केले. अमेरिकेचे पुनर्वैभव मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून ट्रम्प म्हणाले की, आपण सर्व अमेरिकन नागरिकांचे अध्यक्ष असणार आहोत. ज्यांनी मला समर्थन दिलेले नाही त्यांचाही मी अध्यक्ष असेन.
देशाच्या पुनर्बाधणीचे काम आपण तातडीने हाती घेणार आहोत. शहरे, शाळा, रुग्णालयांची पुनर्बाधणी केली जाईल. अमेरिकेची क्षमता मोठी आहे. पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे. या कामासाठी लाखो जणांना काम मिळेल. देशातील नामवंतांचीही काळजी घेतली जाईल. या देशात राहणा-या प्रत्येक नागरिकामध्ये क्षमता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
परराष्ट्र धोरणात अमेरिकेचे हितसंबंध पहिल्यांदा जपले जाईल. मात्र, सर्वाशी आमचा व्यवहार सौहार्दाचा असेल. आमच्याकडे सर्वोत्कृष्ट आर्थिक आराखडा आहे. आम्ही देशाचे उत्पादन दुप्पट करू. जगातील मजबूत अर्थव्यवस्था बनवली जाईल, असे त्यांनी सांगितले.