मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये स्टंट करताना होणारे अपघात काही नवे नाहीत. काही दिवसांपूर्वी चर्चगेटजवळ असाच एक अपघात घडला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरलही झाला होता. व्हिडीओ बघितल्यानंतर सगळ्यांनाच या व्हिडिओतील आलम खान हा मुलगा मृत्यूमुखी पडला असाच सर्वांचा समाज झाला होता. मात्र, हा या अपघातातून हा मुलगा आश्चर्यकारकरित्या बचावला असून त्याच्या डोक्याला छोटीशी जखम सोडली तर त्याला काहीच झालेले नाही. विशेष म्हणजे आता रेल्वेकडून आलम खान याला रेल्वेच्या स्ंटटविरोधी अभियानाचा पोस्टर बॉय बनविण्याचा विचार सुरू आहे.
३० ऑक्टोबरला आलम खान त्याच्या मित्रांबरोबर फॅशन स्ट्रीटला खरेदी करायला जात असताना हा प्रकार घडला. यावेळी चर्नी रोड आणि मारिन लाईन्स स्थानकांदरम्यान चालत्या ट्रेनमध्ये आलमचे स्टंट सुरू होते. तो ट्रेनच्या फुटबोर्डवरून बराच बाहेर येऊन स्टंट करत होता. यावेळी एका खांबाचा जोरदार फटका बसून आलम ट्रेनमधून खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याचे मित्र पुढील स्थानकात उतरून त्याला वाचवण्यासाठी धावले. त्याला व्यवस्थित बघून त्यांच्याही जिवात जीव आला. त्याला थोडीशी मलमपट्टी करून सगळे घरी गेले. मात्र घरच्यांच्या भीतीने त्याने घडलेला प्रकार कुणालाही सांगितला नाही. आपला बाईक अपघात झाल्याचे त्याने घरी सांगितले. ज्यावेळी व्हिडियो वायरल झाला तेव्हा कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. कुटुंबियांनी जाब विचारला तेव्हा त्यानं घडलेली घटना सांगितली. दरम्यान, व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी फेसबुकच्या माध्यमातून आलमचा छडा लावला आणि त्याला भाईंदरवरून बोलावून घेतले. आलम अल्पवयीन असल्याने रेल्वे पोलिसांनी अटक न करता केवळ दंडाची कारवाई करून सोडून दिले होते. आज त्याला जुवेनाईल कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.