भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे निधन

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे सोमवारी पहाटे दिर्घ आजाराने निधन झाले. त्या ७७ वर्षाच्या होत्या. वाजपेयी सरकारच्या काळात मेहता यांनी उर्जामंत्रीपदही भूषवले होते.

औरंगाबादमध्ये जन्मलेल्या जयवंतीबेन मेहता यांनी १९६२ मध्ये राजकारणात प्रवेश केला. १९६८ मध्ये त्यांची पहिल्यांदा मुंबईच्या नगरसेवकपदी निवड झाली. तब्बल १० वर्ष त्या नगरसेवक होत्या. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. यानंतर दोनदा आमदारकीची टर्म पूर्ण केल्यावर मेहता यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागली. १९८९ मध्ये त्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या. तीन वेळा लोकसभेत निवडून गेलेल्या जयवंतीबेन मेहता यांच्याकडे वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात उर्जा मंत्रालयाची धूरा देण्यात आली होती. १९९१ – १९९५ या कालावधीत त्यांनी भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्षपद भूषवले होते. तर १९९३ – ९५ या कालावधीत त्या भाजपच्या उपाध्यक्ष होत्या. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत जयवंतीबेन मेहता यांच्यासमोर मिलिंद देवरा यांचे आव्हान होते. मात्र देवरा यांच्याकडून मेहता यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ‘मार्चिंग विथ टाईम’ या इंग्रजी आत्मचरित्राचे लेखनही त्यांनी केले होते.

जयवंतीबेन मेहता यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. मेहता यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे सोमवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *