भारत – पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे लग्न होणार की नाही या चिंतेत पडलेल्या जोडप्याला केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे. राजस्थानच्या नरेश तिवानीचं पाकिस्तानमधील प्रिया बच्चानीशी लग्न ठरलं होतं. पण भारत – पाकिस्तानमधील तणावामुळे त्यांना व्हिसा मिळत नव्हता. पण शेवटी एक महिन्यानंतर सुषमा स्वराज यांनी दोघांनाही लग्नाची भेट देत वधू प्रिया बच्चानी आणि तिच्या कुटुंबाचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
सर्व ठरल्याप्रमाणे 7 नोव्हेंबरला नरेश तिवानी आणि प्रिया बच्चानी विवाहबंधनात अडकणार होते. पण पाकिस्तानधील भारतीय दुतावासाकडून आपल्याला आणि कुटुंबियांना व्हिसा मिळत नसल्याची तक्रार प्रियाने ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांच्याकडे केली होती. आपल्यासहित 35 नातेवाईकांना व्हिसा मिळावा असी विनंती तिने केली होती. सुषमा स्वराज यांनी यावर लक्ष देत प्रिया आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा मिळवून दिला आहे.
‘सुषमा स्वराज यांनी दिलेल्या तात्काळ उत्तरासाठी आम्ही त्यांचे आभारी आहे. सर्व 35 नातेवाईकांना व्हिसा मिळाला असून दोन भागांमध्ये ते भारतात येणार आहेत,’ अशी माहिती नरेशने दिली आहे.
नरेश तिवानी आणि कराचीमधील प्रिया बच्चानीचा दोन वर्षापुर्वी साखरपुडा झाला होता. एका मॅट्रिमोनी साईटच्या माध्यमातून दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आले होते. 2014 मध्ये साखरपुड्यासाठी प्रिया बच्चानी आणि तिचं कुटुंब जोधपूरला आलं होतं. प्रियाच्या वडिलांच्या निवृत्तीपर्यंत लग्न करायचं नाही असं ठरल्याने लग्नाची तारीख लांबली होती.
ऑगस्टमध्ये प्रियाचे वडिल निवृत्त झाल्यानंतर लग्नाची ताऱीख ठरली होती. व्हिसा मिळवण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण केल्या मात्र व्हिसा मिळणार नाही असं कळल्यानंतर सगळे संभ्रामवस्थेत होते.. प्रियाच्या कुटुंबियांनी स्थानिक नेत्यांकडे मदत मागितली होती. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. शेवटी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मदतीला धावल्याने हे लग्न निर्विघ्न पार पडणार आहे.