घरफोडी करण्यासाठी आलेल्या सराईत चोराचा मृत्यू

घरफोडी करण्यासाठी दादर परिसरात आलेल्या सराईत चोराचा नागरिकांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. स्वामी रामशिजोर यादव असे या चोराचे नाव असून, या प्रकरणी जमावाविरोधात गुन्हा दाखल करत, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सराईत गुन्हेगार असलेला यादव, हा बुधवारी दुपारी दादरच्या भवानी शंकर रोड परिसरात असलेल्या जानकी निवासमध्ये चोरी करण्यासाठी घुसला. घराच्या पोटमाळ्यावर चोर शिरल्याचे लक्षात येताच, गौरव रांगणकर आणि त्याचा भाऊ उत्कर्ष यांनी या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादव याने उत्कर्षच्या हातावर चाकूने वार करून तेथून पळ काढला. जखमी अवस्थेतही दोघे भाऊ या चोराचा पाठलाग करत होते. अखेर सैतान चौकीजवळील लोखंडी गेटवरून उडी टाकून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेला यादव पाय घसरून रस्त्यावर पडला. ही संधी साधून स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिल्याची माहिती पोलिसांना दिली.

दादर पोलिसांनी जखमी यादवला सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जखमी उत्कर्ष याच्यावरही उपचार करून त्याला घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *