थायरॉईडची गाठ काढण्यासाठी घशाला छेद न देता ‘अॅण्डोस्कोपी’ शस्त्रक्रियेद्वारे मुखावाटे सुमारे साडेतीन सेंटीमीटरची गाठ यशस्वीरित्या काढण्यास परळ येथील महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे.
थायरॉईडची गाठ काढताना घशाला छेद देऊन ही गाठ काढली जाते. या शस्त्रक्रियेला छेद पाडलेल्या जागी टाके मारावे लागतात. या टाक्यांमुळे अनेकदा रुग्णांना वेदना सहन करावी लागते. रुग्णांना होणार हा त्रास टाळण्यासाठी टाक्याविना ही गाठ तोंडावाटे काढण्यात आली आहे. परळमध्ये राहणा-या ज्योत्स्ना कदम (नाव बदलले) यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या महिलेला काही महिन्यांपासून अन्न गिळायला त्रास होत होता. यासाठी त्यांनी खासगी डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली होती.
त्यानंतर संबंधित डॉक्टरांनी मोठय़ा डॉक्टरला दाखविण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबियांनी महिलेला केईएम रुग्णालयात उपचारासाठी आणले. वैद्यकीय चाचणीत गळ्यात गाठ असल्याचे निदान झाले. ती शस्त्रक्रियेद्वारे काढावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगताच गळ्यावर शस्त्रक्रियेची खूण राहील या भितीने महिलेने शस्त्रक्रियेस नकार दिला. मात्र, डॉक्टरांनी समजूत काढल्यानंतर शस्त्रक्रियेस होकार दिला. परंतु, आता टाक्यांशिवाय थायरॉईडपासून मुक्ती मिळाल्याने त्या आनंदीत आहेत.
राज्यात थायरॉईड रुग्णांची संख्या वाढतेय
आम्ही अत्याधुनिक पद्धतीने तोंडावाटे दुर्बिण टाकून गळ्यातली गाठ तोंडावाटे बाहेर काढली. भूलतज्ज्ञ डॉ. आर.डी. पाटील आणि डॉ. श्रीनिवास यांच्या मदतीने एका तासात शस्त्रक्रिया पूर्ण केली. पूर्वी थायरॉईडची गाठ काढण्यासाठी गळ्याला चीर द्यावी लागत होता. पण आता टाके न लावता शस्त्रक्रिया केली जात आहे. या शस्त्रक्रियेत रुग्णांना कमी त्रास होतो. सध्या राज्यात थायरॉईड रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. बाहृरुग्ण विभागात दर आठवडय़ाला ६-७ नवीन रुग्ण येतात
