जुहू चौपाटीवर मोबाईल टॉयलेट

जुहू चौपाटीवर प्रचंड अस्वच्छता पसरत असून त्याचा त्रास येथे सकाळी आणि सायंकाळी फेरफटका मारण्यास जाणा-या नागरिकांना होत आहे. त्यामुळे चौपाटीवर स्वच्छतेला प्राधान्य देताना तेथे अत्याधुनिक फिरत्या प्रसाधनगृहाची (मोबाईल टॉयलेट) व्यवस्था लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या अत्याधुनिक मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. येत्या काही दिवसांत या टॉयलेटची व्यवस्था केली जाणार आहे.

जुहू चौपाटीवरील स्वच्छतेबाबत काही दिवसांपूर्वी जुहू रेसिडेंट फेडरेशनने स्वच्छता मोहीम राबवून ही किनारपट्टी स्वच्छ केली होती. त्यामुळे या स्वच्छतेबाबत तसेच याठिकाणी प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महापालिका आयुक्तांकडे चर्चा करून याबाबत त्वरित लक्ष देण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जुहू चौपाटीवरील स्वच्छता व प्रसाधनगृहाच्या व्यवस्थेबाबत विशेष लक्ष वेधले.

जुहू चौपाटीवर सध्या कामगारांमार्फत तसेच यांत्रिक झाडूद्वारे सफाई केली जाते. ही साफसफाई आणखी चांगल्याप्रकारे करण्याचे निर्देश दिले असून येत्या गुरुवारी या संदर्भात आढावाही घेतला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले.

बदलत्या ‘लाईफ स्टाईल’मुळे मधुमेही रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे चौपाटीवर फिरण्यास येणा-या नागरिकांना प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध होण्यासाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली जाईल. हे टॉयलेट अत्याधुनिक पद्धतीचे असतील, असे अजोय मेहता यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील सागरी किनारपट्टयांवर बांधकाम करण्यास ‘सीआरझेड’ची परवानगी आवश्यक असल्यामुळे त्याला होणारा विलंब लक्षात घेता त्वरित उपाययोजना म्हणून मोबाईल टॉयलेटची व्यवस्था जुहू चौपाटीवर ठराविक अंतरावर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *