अनैतिक संबंधाला विरोध केल्याने विवाहितेला पेटविले

आपल्याबरोबर अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून अंगावर रॉकेल टाकून पतीच्या मित्राने विवाहितेला पेटवून दिले. तसेच यांची माहिती बाहेर कुणाला सांगितली तर आईसारखे तुम्हालाही जाळून मारीन, अशी धमकी आरोपीने मृत महिलेच्या मुलांना दिली आहे.

राहुल प्रेमराज चौधरी असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात विवाहितेच्या वडिलांनी आरोपीविरोधात तक्रार दिली आहे. मात्र या खळबळजनक घटनेनंतरही पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केलेला नसल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील शेतकरी विठ्ठल मारुती जंबे यांच्याशी सविता नारायण शेलार हिचा विवाह झाला होता. पंधरा वर्षाच्या संसारात त्यांना मुलगा दत्तात्रय व मुलगी सायली अशी दोन मुले होती. मात्र शेजारी राहणारा राहुल चौधरी याची सविता ऊर्फ राणी हिच्यावर वाईट नजर होती. त्यामुळे तो तिला नेहमी त्रास देत असे. समज देऊनही तो ऐकत नव्हता.

रविवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास घरी कुणी नसल्याचे पाहून राहुलने सविताकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र याला नकार दिल्याने राहुल याने तिला मारहाण करत अंगावर राकेल ओतून सविताला पेटवून दिले. तसेच ही गोष्ट बाहेर कुणाला सांगितली तर तुझ्या मुलांनाही असेच मारीन, अशी धमकी आरोपीने सविताला आणि मुलांना दिली. ऐंशी टक्के भाजलेल्या सविताला मुलांनी उपचारांसाठी गावातील रुग्णालयात आणले असता तिथे दाखल करून न घेता दौंड येथे पाठविले. पुढे पुणे येथील सूर्या रुग्णालयात दाखल केले. तिथे सविताने भीतीपोटी घरात घटस्थापनेला दिवा लावत असताना मांजराने उडी मारल्याने रॉकेलचा डबा अंगावर पडून आग लागली असा खोटा जबाब पोलिसांना दिला.

दरम्यान, पाच दिवसांनी सविताचा मृत्यू झाला. तिच्यावरील अंत्यसंस्काराच्या वेळी मुलांनी आक्रोश करत जमलेल्या लोकांना आमची आई मेली नसून तिला शेजारच्या राहुल चौधरीने अंगावर रॉकेल टाकून पेटविले आहे. तसेच बाहेर कुणाला सांगितले तर आईसारखे तुम्हा दोघांनाही मारून टाकीन अशी धमकी दिली. तसेच आईनेही कोणाला सांगू नका, हा माणूस तुम्हाला मारील असे सांगितले. हा सर्व प्रकार कळल्यावर सर्व नातेवाईकांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात आरोपीच्या अटकेची मागणी केली.

मात्र आरोपी एका राजकीय पुढा-याचा कार्यकर्ता असल्यामुळे तेथील पोलीस निरीक्षकाने उलट विवाहितेच्या घरच्यांना व नातेवाईकांना दम देऊन माघारी पाठविले. केवळ तक्रार अर्ज घेऊन तपास करू, असे मोघम उत्तर दिले. पण सविताला न्याय मिळेपर्यंत तसेच आरोपी राहुल चौधरीला अटक करून त्याला कडक शिक्षा देईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अन्यथा आम्ही नगर येथे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करू, अशी मागणी सविताचे वडील विठ्ठल शेलार व भाऊ अनिल शेलार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *