वसईच्या एव्हरशाईन परिसरातील एका इमारतीमध्ये वातानुकूलित यंत्रणेत (एसी) लागलेल्या आगीच्या धुरामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील सॅवियो सोसायटीत ए विंग मधील रुम २०३मध्ये सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी रूम क्रमांक २०३च्या वातानुकूलित यंत्रणेत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामुळे एसीच्या कॉम्प्रेसरमधून धूर येऊ लागला. हा धूर वरच्या मजल्यावरील खोली क्रमांक ३०३ पर्यंत पोहचला. या खोलीतील सर्वजण साखरझोपेत असल्यामुळे धुरामुळे संपूर्ण खोली भरून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे या खोलीतील रहिवासी उदय मोहन कांचे आणि त्यांचा नऊ महिन्याचा मुलगा पारस हे दोघेही गुदमरुन बेशुद्ध पडले. तर पाहुणे म्हणून आलेले उदयचे ६२ वर्षांचे मामा जयंत देशकर यांना यात जीव गमवावा लागला. या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.