वाद न घालता जवानांच्या पाठीशी उभे राहा

पाकिस्तानी कलावंतांना बॉलीवूडमध्ये स्थान द्यावे की देऊ नये, यावर वाद घालण्याची ही वेळ नसून सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या भारतीय जवानांच्या मागे एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले.

उरी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राइकनंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये स्थान द्यावे की देऊ नये, या मुद्द्यावर भारतीय कलाकारांचे दोन गट पडले आहेत. अक्षय कुमार, अजय देवगण, नाना पाटेकर आदी अभिनेत्यांनी पाकिस्तानी कलाकारांना विरोध; तर ओम पुरी, सलमान खान, करण जोहर, राधिका आपटे आदींनी त्यांची पाठराखण केली आहे. याबाबत अनेक दिवस मौन बाळगून असणाऱ्या सुपरस्टार, ‘बिग बी’ बच्चन यांनी या वादात थेट उडी घेण्याचे टाळले.

आपला ७४वा वाढदिवस मंगळवारी कुटुंबीय आणि आप्तेष्टांसोबत साजरा केल्यानंतर ‘बिग बीं’नी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्काराबाबत भूमिका विचारण्यात आली असता अमिताभ यांनी, हात जोडून विनंती करीत असे प्रश्न विचारण्याची ही वेळ नसल्याचे सांगितले. ‘कुणी, कुठे आणि काय म्हणाले, यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. देशावर संकट आहे आणि सीमेवर घडणाऱ्या घटनांमुळे देशातील नागरिक अत्यंत संतप्त झाले आहेत,’ असे त्यांनी नमूद केले. तसेच आपण सर्वच कलाकारांचा आदर करतो, मात्र आपल्या सुरक्षिततेसाठी स्वत:च्या जिवाचे मोल देणाऱ्या भारतीय जवानांमागे एकजुटीने उभे राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. उरी हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते गाणे गाणार असल्याच्या वृत्ताचा अमिताभ यांनी इन्कार केला. ‘एका खासदाराने मी गायिलेल्या हनुमान चालिसा आणि गणपती आरतीचे कौतुक केले. तसेच मी उरीतील हुतात्म्यांसाठी गावे असे सुचविले. मी तयारी दर्शविली, मात्र अद्याप त्याबाबत काहीही ठोस ठरले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *