मुंबईतील खड्डे मोजण्यासाठी पालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागली तरी रस्त्यावरील खड्डे दिवसभरात मोजून पूर्ण होणार नाहीत. याच महापालिकेचे अधिकारी मुंबईत अवघे 35 खड्डे शिल्लक असल्याचा हास्यास्पद दावा करून, आपली स्वत:चीच नाही तर मुंबईकरांची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबईत सहज फेरफटका मारला, तरी किमान 500 खड्डे दिसून येतील. असा एकही रोड नाही की तेथे खड्डे नाहीत; पण पालिका प्रशासन हे मानायलाच तयार नाही. त्यामुळे पालिकेच्या अभियंत्यांना आता राजकीय पक्षांकडून भर रस्त्यात उभे केले जात आहे. येणार्या काळात जर मुंबईकरांचा सयंम सुटला तर पालिका अधिकार्यांनाच नाही तर अधिकार्यांचे नाव पुढे करून, कंत्राटदारांची पाठराखण करणार्या राजकीय पक्षालाही सोडणार नाही; पण पालिका प्रशासनाला यांची भीती नसल्यामुळे मनाला येईल तो खड्यांचा आकडा सांगून प्रशासन स्वत:ची सुटका करून घेत आहे. आजही गोराई, घाटकोपर, सायन, गोरेगाव, मालाड, गोराई, कांदिवली भागात किमान एका रस्त्यावर 200 ते 300 खड्डे तर काही ठिकाणी रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याचे नगरसेवकांनी रस्ते विभागाचे मुख्य अभियंता संजय दराडे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
बुधवारी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी मुंबईत अवघे 35 खड्डे बुजवायचे बाकी असल्याचे सांगून भर स्थायी समितीत स्वत:चे हसे करून घेतले. रस्त्यांवरील खड्ड्यांवरून अधिकार्यांना टार्गेट केले जात असताना, पालिका आयुक्त अजोय मेहता हे गप्प का, असा सवाल आता केला जात आहे; पण आता फारकाळ मुंबईकर गप्प बसणार नसल्यामुळे पालिका आयुक्तांना ठोस निर्णय घेणे भाग पडणार आहे.
