कल्याण येथील एका तरुणीच्या हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी भिवंडी रिमांड होममधून सोमवारी पळून जाण्यात यशस्वी ठरला. हा अल्पवयीन आरोपी साधासुधा नसून त्याच्यावर दोन हत्या, दोन हत्यांचे प्रयत्न आणि अनेक दरोडयाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यासह अन्य दोन कैदीही पळून गेले.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीला पकडण्यासाठी तीन टीम्स बनवल्या आहेत. पळून गेलेला अल्पवयीन आरोपी घरफोडी करणा-या टोळीमध्ये होता. एप्रिल महिन्यात या टोळीने कल्याणमधील एका गृहनिर्माण सोसायटीच्या तिस-या मजल्याच्या फ्लॅटमध्ये घरफोडी केली.
२२ वर्षीय तरुणी रात्रीच्यावेळी घरात एकटी असताना ही टोळी घरामध्ये घुसली. त्यांच्या हालचालीने तरुणीला जाग आली. तिने आरडाओरडा करण्याआधीच अल्पवयीन आरोपीने तिच्या डोक्यात तलावारीने आघात केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर तिथून निसटण्यापूर्वी या अल्पवयीन आरोपीने तरुणीच्या मृतदेहासोबत लैंगिक चाळे केले.
मॅकेनिकल इंजिनीयर असलेल्या या तरुणीला पोलिस अधिकारी व्हायचे होते. ती एमपीएससीची परिक्षाही पास झाली होती. पोलिसांनी या आरोपीविरोधात प्रौढासाठी असणा-या कायद्याखाली खटला चालवण्याची मागणी केली होती. पणे ज्युवेनाईल जस्टीस बोर्डाने त्यांची मागणी फेटाळून लावली व आरोपीला रिमांड होममध्ये पाठवले.