मेथी :चविष्ट आणि रुचकर

कुणीसं म्हटलं आहे, ‘संसारासाठी किती हाल, कितीही खाव्या खस्ता, निघावे घरून सकाळी, करून भरपेट नाश्ता.’ खरं सांगू का, हे कुणीसं वगैरे काही नाही, मीच आत्ता म्हटलंय. पण पु.ल. म्हणतात, तसं आपल्याकडे काय म्हटलंय याच्यापेक्षा कुणी म्हटलंय, याला जास्त महत्त्व असल्यामुळे काय म्हटलंय, याच्यापेक्षा कुणी म्हटलंय कळल्याशिवाय कान टवकारले जात नाहीत.  मेथी म्हटल्यावर लगेच नाकं मुरडण्याची गरज नाही. हा पदार्थ खरंच चविष्ट आणि रुचकर आहे. मेथी हा काही फार उत्साहानं खाण्यासारखा किंबहुना चर्चा करण्यासारखा प्रकार नाही, हे मान्य, पण तसं तर अंघोळसुद्धा करण्याचा आपल्याला रोज कुठे उत्साह असतो? लोकलज्जा म्हणा, औपचारिकता म्हणा किंवा दिनक्रमाचा एक भाग म्हणूनसुद्धा अंघोळ करणारे काही महाभाग असतातच की! तर, मेथीची भाजी हा असाच एक कमी पसंतीचा प्रकार असला, तरी तो अतिशय औषधी आणि शरीलाला उपायकारकही आहे. प्रथिनं (प्रोटीन्स), फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, लोह, असे काही हितकारक घटक असतात. सौंदर्य वाढवणं, प्रकृती उत्तम ठेवणं, रक्त शुद्ध करणं, अशी कामंही मेथी करू शकते. आता ती आपल्यासाठी एवढं करत असेल, तर आपण तिच्याकडे अगदीच पाठ तरी कशाला फिरवायची? मेथीचे पराठे तर लोकप्रिय आहेतच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *