पंचवीस लाखांची वाघाची कातडी जप्त

कॉलेजरोड परिसरात वाघाची कातडी विकण्यासाठी आलेल्या संशयित तरुणास सरकारवाडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या तरुणाकडून पोलिसांनी 25 लाख रुपये किमतीची वाघाची कातडी जप्त केली आहे. ओमकार राजेंद्र आहेर (19, रा. गजरा पार्क, कमोदनगर, इंदिरानगर) असे या संशयिताचे नाव आहे. जप्त केलेली वाघाची कातडी हैदराबादच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सरकारवाडा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक वाय. डी. उबाळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक संशयित वाघाची कातडी विकण्यासाठी कॉलेजरोड परिसरात येणार असल्याचे समजले. त्यानंतर उबाळे यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगितली. त्यानुसार अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मिळून संशयितास पकडण्यासाठी सापळा रचला. त्यावेळी संशयित आहेर हा कॉलेजरोड परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. याप्रकरणी आहेर याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात वन्यप्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उबाळे, सोनवणे, दिलीप शिंदे, सचिन अहिरराव यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *