गरमागरम कांदेपोहे, त्यावर शेव, किसलेले खोबरे व लिंबाची फोड… खमंग नाश्त्याचे नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटते. तेव्हा आप्पाज गुरुदेव स्नॅक्स सेंटरकडे खवय्यांची पावले वळतात. पुण्यात नारायण पेठेतील शगुन चौक येथे आप्पाज गुरुदेव स्नॅक्स सेंटर येथे पोह्यापासून ते पिझ्झा, सँडविचचे विविध प्रकार पुणेकरांना चाखायला मिळतात. येथील सकाळची न्याहारी ही हलकीफुलकी आणि पोटाची भूक भागविणारी असते. सकाळी ६.३० ते दुपारी १२ या वेळेत पोह्याच्या नाश्त्यासोबत शिरा, उपमा, जोडीला साबुदाणा खिचडी, सामोसा, सामोसा सांबर, इडली चटणी, ब्रेड पॅटिस, खमंग ढोकळा असे न्याहारीचे विविध प्रकार असले तर मग खवय्यांची चंगळच होते. त्यानंतर दुपारी २ नंतर ते रात्री १०पर्यंत पिझ्झा, सँडविच, बर्गरचे विविध प्रकार उपलब्ध असतात. २००६ मध्ये सुनील केंदळे आणि राजीव केंदळे या बंधूंनी मिळून हे स्नॅक्स सेंटर सुरू केले आणि खाण्याच्या विविध व्हरायटीने पुणेकर खवय्यांच्या जिभेवर राज्य केले. सुरुवातीला त्यांच्याकडे इंदुलकर हे आचारी कामाला होते. त्यांना ते ‘आप्पा’ असे संबोधत असत. त्याच नावावरून त्यांनी आप्पाज स्नॅक्स सेंटरला सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे १२ माणसे कामाला आहेत. सकाळी ४ वाजल्यापासून ते कामाला सुरुवात करतात. आपल्या होम मेड पिझ्झाविषयीचे वेगळेपण सांगताना सुनील केंदळे आणि राजीव केंदळे म्हणाले की, आमच्याकडील पिझ्झामध्ये देशी व घरगुती मसाले व अन्य मिश्रणांचा वापर केला जातो. त्यामुळे याची चव इतर ठिकाणी मिळणार्या पिझ्झांपेक्षा वेगळी आणि रुचकर लागते. त्याचप्रमाणे व्हेज सँडविचपासून चॉकलेट सँडविचपर्यंत १५ प्रकारात सँडविच उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बर्गर, शेवपावदेखील उपलब्ध आहेत. – पनीर पिझ्झा आणि व्हेज पिझ्झाला पुणेकरांची अधिक पसंती आहे. येथील पिझ्झाचे वैशिष्ट्य म्हणजे कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, वाटाणा, मका, बटाटा, मायोनीज, भाज्या, चीज यांचे एकत्रित मिश्रण करून त्यावर सॉस, चीज यांचे लेयर करून पिझ्झाचा बेस ठेवला जातो. तसेच विविध स्वादातील १० प्रकारचे पिझ्झा उपलब्ध असून ५० रुपयांपासून ते ७० रुपयांपर्यंत मिळतात.